शुक्रवार, 26 अगस्त 2011

धडे त्सुनामी व्यवस्थापनाचे

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११
हैद्राबादला पोहचलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. रात्रभर कोसळणार्‍या पावसाने सर्व रस्ते चिंब झाले होते. बाहेर गारवा जाणवत होता. समोरच्या जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तीर्ण इमारतीकडे लक्ष गेलं. चहाची टपरी सुरु झाली होती. रिक्षावाला शोधतांना समोर बोर्ड दिसला. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (इनकोसीस)

भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाचा हा विभाग गेली १० वर्षे त्सुनामी संबंधीची माहिती अपडेट करतोय. त्याच इमारतीत एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तेथे सहभागी होता आले याचा आनंद होता. खरतर हा विषय एकदमच नवी न होता. कार्यशाळेत कोण असेल याचा अंदाज घेत सकाळी ९:०५ मिनीटांनी नोंदणीचे सोपस्कार आटोपले. पाठोपाठ रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांचा प्रवेश झाला. सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर जाणवलं की येथे वेगळंच काही होणार आहे.

एकमेकांचा परिचय झाला. भारतातल्या सागर किनार्‍यातील निवडक राज्यातील विविध क्षेत्रातील मोजकेच अधिकारी या कार्यशाळेसाठी बोलावण्यात आले होते. भारतीय त्सुनामी तात्काळ सूचना प्रणाली संबंधी माहिती संचालक डॉ.टी. श्रीनिवास कुमार यांनी दिली. वीस वर्षापूर्वी त्सूनामी या विषयी केवळ एक परिच्छेद अभ्यासक्रमात होता आज स्वतंत्र शाखा झाल्याचे सांगतांना त्यांच्याकडे असणार्‍या ज्ञानाचे भांडार शब्दा शब्दात जाणवत होते. त्सुनामी येण्याची पूर्व कल्पना शास्त्रशुध्द पध्दतीने जगभरातून तात्काळ मिळविता येते आणि त्या माहितीचा उपयोगही होऊ शकतो.

त्सुनामी विषयी जनजागृती आणि त्याची पूर्व तयारी या विषयीची माहिती पंतजली कुमार यांनी दिली. ए.के. शर्मा यांनी अंदमान निकोबार मधील त्सुनामी संबंधी केलेल्या उपाययोजना विस्तृत स्वरुपात सांगितल्या. श्रीमती एम.व्ही. सुनंदा यांनी त्सुनामी संबंधीची सूचना कशी वाचली जावी, त्याचे अर्थ आणि उपाययोजना या विषयी अवगत केले. डॉ.उमा देवी, बी. अजय कुमार यांच्या टेबलटॉप एक्सरसाईज ने सार्‍यांना वेगळ्या विश्वात नेऊन ठेवले आणि त्सुनामी आल्याचा भास देऊन गेलं. समारोप मस्त वाफाळलेल्या चहा सोबत हैद्राबादी बिस्कीटांनी झाला. माझ्या मनात मात्र सिंधुदुर्गचा समुद्र दिसत होता. खरच त्सुनामी आली तर काय होईल ? आपली तयारी आहे का? या विचारात सोबत असलेली माहिती पत्रकं चाळू लागलो.

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध सेवा दिल्या जातात. समुद्राचे राष्ट्रीय विकासातील महत्व लक्षात घेता या संबंधी अधिक संशोधन गरजेचे मानून या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. सागराशी संबंधीत सर्व घटकांना, उद्योगांना, शासनाला आणि शास्त्रज्ञांना पध्दतशीर व सुकेंद्रित संशोधनाद्वारे, सागरी निरीक्षणांद्वारे अचूक माहिती व सल्ला या केंद्रामार्फत दिला जातो. भारतातील समुद्रकिनार्‍यावरील २०० केंद्रामधून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार मासेमारीचे स्थळं कोणती याचे मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन जून ते सप्टेंबर या महिन्यात दिले जात नाही.

त्सुनामी म्हणजे पृथ्वीवर होणारी नैसर्गिक आपत्ती होय. समुद्रातील भुकंप असाही उल्लेख केला जातो. त्सुनामी आल्यानंतर लाटांची उंची वाढते. त्यामुळे किनार्‍यापासून दूर जाणे हा एकमेव पर्याय झाला आहे. त्सुनामी येण्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ समुद्रातून बाहेर पडणे आवश्यक आहे. किनार्‍यापासून दूरवर उंच ठिकाणी जाऊन उभे राहीले पाहीजे. त्सुनामी ओळखता येते. प्रथम जमिनीत कंप निर्माण होतात. समुद्रातील पाण्यात लाटांमध्ये बदल दिसू लागतात. हवेचा आवाज देखील मोठय़ाने येऊ लागतो. मच्छीमारांसाठी त्सुनामी हे मोठे संकट आहे. अशा वेळी तात्काळ किनार्‍याकडे येणे खूपच आवश्यक आहे. बोटीवर संपर्क यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

हैद्राबादमधील केंद्रातून तात्काळ माहिती संपूर्ण भारतात दिली जाते. त्या माहितीच्या आधारे जिवीत हानी टाळता येऊ शकते. २६ डिसेंबर २००४ ला भारतीय समुद्रात त्सुनामी आली होती. ४३ बिलीयन डॉलरचे नुकसान त्यामुळे झाले. भारतीय समुद्रतटावर जेथे त्सुनामीची शक्यता आहे असे क्षेत्र निवडण्यात आली असून तेथे अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदविली जातात. जवळपास १७ ब्रॉडबॅन्ड अतिसंवेदनशील सेन्सर काम करतात. ७ ठिकाणी समुद्राच्या तळात घडणार्‍या बदलांची माहिती नोंदविली जाते.

त्सुनामी नोंदविण्यासाठी ३६ स्वयंचलीत केंद्रे समुद्रात २४ तास काम करतात. यासाठी पृथ्वीविज्ञान मंत्रालय, अवकाश विभाग यासह गृहविभागा सोबतच अन्य विभागाच्या समन्वयाने त्सुनामी संबंधी अद्यावत माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय भारत हा असा एकमेव देश आहे की, ज्या देशाने त्सुनामी माहिती विषयक केंद्र स्थापन केलं आहे. ११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या त्सुनामीनंतर सार्‍या जगाला या विषयी चिंता वाटते आहे. भारतात असे काही झाले तर तयारी असावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन करता येते. त्सुनामी येण्याअगोदर आणि नंतर करावयाच्या कामांसाठी अशा पध्दतीची कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरत असते.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम करतांना अशा प्रशिक्षणाची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोणत्याही नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी माहिती होणे आणि आपत्ती आल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी मनाची तयारी होणे हे केवळ शास्त्रशुध्द प्रशिक्षणामुळेच शक्य होते. हैद्राबादमधील (इन्कोसीस) भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि चारमिनारच्या भेटीसह कायमचे लक्षात राहील, असा विचार असतांनाच समोर बस आली आणि परतीचा प्रवास सुरु झाला होता. उद्या पुन्हा सिंधुदुर्गच्या समुद्र किनार्‍यावर जाऊन काम काय करणे आवश्यक आहे याची यादी सुरु होती.

  • डॉ. ग. व. मुळे

  • कोई टिप्पणी नहीं:

    एक टिप्पणी भेजें