शुक्रवार, 26 अगस्त 2011

चक्रीवादळात घ्यावयाची काळजी

महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याजवळील भागातील अधिकारी,मच्छीमार व इतर लोकांनी चक्रीवादळ येण्यापूर्वी व येऊन गेल्यावर करावयाच्या उपाययोजना माहितीसाठी पुढे दिल्या आहेत. हवामान खात्याकडून चक्रीवादळाच्या धोक्यासंबंधीचा इशारा दोन टप्प्यांमध्ये देण्यात येतो.

चक्रीवादळापूर्वी दक्षतेचा इशारा हा पहिला धोक्याचा इशारा किनाऱ्यालगतच्या भागात प्रतिकूल हवामान सुरु होण्याच्या ४८ तास अगोदर देण्यात येतो.

चक्रीवादळाचा इशारा हा २४ तास अगोदर देण्यात येतो. या इशाऱ्या संबंधीचा माहिती स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत संबंधित भागातील लोकांपर्यत तसेच त्या भागातील मच्छिमारांपर्यत पोहोचविण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणेचा उपयोग करण्याबद्दल आवश्यक त्या सूचना महसूल, पोलीस व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना शासनाने दिल्या आहेत. चक्रीवादळासंबंधीच्या धोक्याचे इशारे आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन दर एक तासांनी देण्याची व्यवस्था करण्यात येते.

चक्रीवादळाचा मोसम सुरु होण्यापूर्वी घरांची तपासणी करावी, निखळलेली कौले शक्यतो सिमेंटने पक्की करावीत.आवश्यक असेल तर खिडक्या-दारांची दुरुस्ती करावी. घरावर घातलेले पत्रे पक्के बसवावेत.

घराच्या आजूबाजूच्या जागेची तपासणी करावी, मेलेली किंवा वठलेली झाडे पाडून टाकावी. उभ्या करुन ठेवलल्या लाकडाच्या फळ्या ,ॲसबेस्टॉस, सिमेंट किंवा टिनचे पत्रे,भिंतीच्या सैल झालेल्या विटा, पत्र्याच्या हलक्या कचरापेट्या, ढिले नामफलक किंवा जाहिरातीचे फलक इत्यादी जोराच्या वाऱ्याने उडून जाणाऱ्या वस्त काढून टाकाव्यात किंवा व्यवस्थित बांधून ठेवाव्यात.

काही लाकडी तावदाने तयार ठेवावीत म्हणजे ती काचेच्या खिडक्यांना ठोकता येतील.रॉकेल भरुन कंदील तयार ठेवावेत. तसेच वीज गेल्यास उपयोगी पडावा म्हणून फ्लॅश लाईट (बॅटरी) तयार असावा. पुरेसे ड्राय सेल्स जवळ असावेत.

निकामी, पडझड झालेली, कच्ची बांधकामे पाडून टाकावीत.ज्यांच्याकडे रेडिओ आहेत त्यांनी ते व्यवस्थित चालतात याची खात्री करुन घ्यावी. ठ्रन्झिस्टरच्या बाबतीत बॅटरीचा आणखी एखादा संच हताशी ठेवावा.

वादळाचा इशारा देण्यात आलेल्या भागात करावयाच्या उपाययोजना 

आपले रेडिओ, टीव्ही चालू ठेवावेत आणि हवामानाविषयक ताज्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे. अगदी नजीकच्या आकाशवाणी केंद्राकडून मिळाणारा सल्ला लक्षात घ्यावा व त्यासंबंधी माहिती इतरांनाही द्यावी.

अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त रेडिओ, टिव्हीद्वारे अथवा इतर मार्गानी मिळालेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा व ती इतरांना द्या.

भरती किंवा वादळी लाटांचा उपसर्ग पोचेल अशा स्थानांपासून दूर रहा. सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग पाण्याने भरुन जाण्याच्या आधीच तेथे पोचण्याची खबरदारी घ्या व पाण्याने वेढले जाण्याचा धोका टाळा.

जर तुमचे घर भरती किंवा नदीच्या पुराच्या धोक्यापासून सुरक्षित असेल व ते पक्क्या बांधणीचे असेल तर वादळाचे संकट पार करण्याचे ते बहुधा योग्य ठिकाण ठरेल. तथापि, ते रिकामे करण्यात सांगितल्यास तत्परतेने रिकामे करा.

मुसळधार पावसामुळे ज्या भागातील नाले किंवा नद्यांना पूर येतील अशा भागात घरामध्ये पाणी शिरण्याच्या धोक्यापासून सावध रहा.काचेच्या खिडक्यांना लाकडी फळ्या ठोका किंवा मजबूत शटर्स बसवा. घट्ट बसणाऱ्या फळ्यांचा वापर करा. कामचलाऊ फळ्या लावल्यास अजिबात फळ्या न लावण्यापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. बाहेरच्या दरवाज्यांना मजबूत टेकू द्या.

तुमच्याकडे सुटसुटीत लाकडी फळ्या नसतील तर घरामध्ये काचा शिरु नयेत म्हणून खिडक्या-दारांच्या काचांना कागद चिटकवा.घरामध्ये न शिजवता किंवा अगदी थोड्या तयारीनिशी तयार करता येतीलअसे अन्नपदार्थ तयार ठेवा.नीट झाकता येईल अशा भांड्यामध्ये पुरेसे पिण्याचे पाणी ठेवा.

चक्रीवादळामुळे घर सोडावे लागेल अशा भागात आपण रहात असाल तर पाण्याने खराब होऊ शकणाऱ्या वस्तूंचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्या वरच्या मजल्यावर नेऊन ठेवा.

हरिकेन कंदील, फ्लॅश लाईट किंवा आणीबाणीचे दिवे (इमर्जन्सी लाईटस्) चालू स्थितीत असू द्या आणि ते हाताशी तयार ठेवा. ज्या वस्तू पाण्यात वाहून जाण्यासारख्या किंवा फाटण्यासारख्या असतील त्यावर लक्ष ठेवा. घासलेअचे डबे,कॅन्स, शेतीची अवजारे, बागेतील हत्यारे, रस्त्यावरील संकेत चिन्हे आणि तत्सम इतर वस्तू वादळी वाऱ्यात विध्वंसक शस्त्रासारख्या ठरतात म्हणून त्या बंद खोलीत ठेवा.

वाऱ्याच्या दिशेच्या विरुध्द बाजूला असलेला घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडू शकेल याची आधीच खात्री करुन घ्या. मुलांना व वृध्दांना लागणाऱ्या विशेष आहाराची व्यवस्था ठेवा.

वादळाचे केंद्र तुमच्या घराजवळ असण्याची किंवा वादळ तुमच्या घरावरुन जाण्याची शक्यता असेल तर अशा वेळी सुरक्षित जागी रहा. वाऱ्यांचा वेग कमी असण्याच्या काळात आवश्यक त्या निकडीच्या दुरुस्त्या करुन घ्या. परंतु विरुध्द दिशेने जोराचा वारा येण्याची व त्याचा वेग जास्त असण्याची शक्यता लक्षात असू द्या.
गोंधळून जाऊ नका, तुम्ही संकटाला धैर्याने तोंड देण्याची तयारी दर्शविली तर त्यामुळे इतरांनाही स्फूरण येईल व मदत होईल.

चक्रीवादळ येऊन गेल्यावर तुटलेल्या विजेच्या तारांपासून दूर रहा. वीज प्रवाह चालू असलेल्या तारेस चिकटलेल्या एखद्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी ती तार करण्याकरिता कोरड्या काठीसारख्या बंद वीज वाहकाचा वापर केला पाहिजे. तुटलेल्या तारांविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना लवकर द्या.

जेथे झाडे आणि फांद्या पडण्याच्या अवस्थेत असतील , इमारती आणि पूल कोसळण्याचा संभव असेल तेथे चालताना आणि वाहने चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. चक्रीवादळावर साथीचे रोग उद्भवण्याची धास्ती असते अशा रोगापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या.

मदत कार्य करणाऱ्या लोकांखेरीज इतरांनी धोक्याच्या ठिकाणापासून दूर रहावे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें